गावाचा प्राचीन इतिहास

गाव :- चोरवणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामपंचायत चोरवणे, तालुका संगमेश्वर

गावाचा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक सविस्तर आढावा

 

आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत चोरवणे, तालुका संगमेश्वर या गावाचा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक सविस्तर आढावा आपल्यासमोर सादर करताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे.

चोरवणे हे गाव केवळ एक भौगोलिक घटक नसून, ते संघर्ष, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि विकासाची दीर्घ परंपरा असलेले गाव आहे.

१) गावाची स्थापना व ऐतिहासिक पार्श्वभूमी

चोरवणे गावाची स्थापना अंदाजे चौदाव्या ते पंधराव्या शतकात झाली असल्याचे स्थानिक इतिहास, दंतकथा व ज्येष्ठ ग्रामस्थांच्या परंपरागत माहितीतून समजते. पूर्वी या गावाचे नाव “करंबेळे” असे होते. त्या काळात गावाची रचना जंगलप्रधान, निसर्गावर अवलंबून आणि सामूहिक जीवनशैलीवर आधारित होती. पावसावर शेती, कष्टावर उपजीविका आणि एकमेकांवरील विश्वास यावर गाव टिकून होते.

२) प्लेगची साथ, स्थलांतर आणि गडदूची दंतकथा

काळाच्या ओघात गावावर प्लेगसारखी भयानक साथ आली. या साथीमुळे गाव अक्षरशः ओस पडले. अनेक कुटुंबे मृत्युमुखी पडली, वाड्या रिकाम्या झाल्या आणि ग्रामस्थांना गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. या काळात ताटके व नाखरे प्लेग पसरला असल्याचे ग्रामस्थ सांगतात. भीती, आजार आणि असहायतेमुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले.

याच संकटाच्या काळात गावातील काही ब्राह्मणांनी जुगाई देवीच्या देवळाजवळ एक दगड स्थापन केला.

त्या दगडास “गडदू” असे नाव देऊन त्याची देवस्वरूपाने स्थापना करण्यात आली.

लोकपरंपरेनुसार त्या गडदू देवतेविषयी अशी श्रद्धा होती की “जो व्यक्ती किंवा कुटुंब हे गाव कायमचे सोडून जाईल, त्याचा निर्वंश होईल.”तसेच, जो गाव सोडून जाईल त्याच्या पोटावर गडदू बसतो, अशी भीतीदायक समजूत त्या काळात प्रचलित होती. ही दंतकथा त्या काळातील ग्रामस्थांच्या मानसिक अवस्थेचे, भीतीचे व श्रद्धेचे प्रतीक होती.

गडदू ही केवळ देवकल्पना नव्हती, तर गाव टिकवण्याचा, एकत्र राहण्याचा आणि संकटातही गाव सोडू नये असा सामाजिक संदेश देणारी लोकश्रद्धा होती.या श्रद्धेमुळे काही ग्रामस्थ गावातच थांबले, तर काही काळानंतर परत आले. याच जिद्दीतून व श्रद्धेतून चोरवणे गावाचे पुनरुज्जीवन घडून आले. या पुनरुत्थानानंतर “चोरवणं” हे नाव रूढ झाले आणि पुढे त्याचे शुद्ध रूप “चोरवणे” असे प्रचलित झाले.

३) गावातील पहिली वस्ती व समाजरचना

       चोरवणे गावात प्रथम स्थायिक वस्ती बौद्ध समाजाचीच होती, ही बाब गावाच्या सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे. ही वस्ती श्रमप्रधान, शांतताप्रिय आणि सामूहिक जीवनावर आधारित होती.पूर्वी गावात फक्त वाड्यांची रचना होती.सामूहिक शेती, परस्पर साहाय्य आणि सामाजिक बांधिलकी ही गावाची ओळख होती.त्या काळात समाजघटक म्हणून बारा बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती, ज्यामध्ये— लोहार, सुतार, न्हावी, कुणबी इत्यादी घटकांचा समावेश होता.

त्या काळात गावात मुस्लिम समाज व चांभार समाजाची वस्ती नव्हती, हे त्या वेळच्या सामाजिक रचनेचे वैशिष्ट्य मानले जाते.

४) शिवकालीन, पांडवकालीन व ब्रिटिशकालीन संदर्भ

चोरवणे गावाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी जोडलेला आहे.स्थानिक परंपरेनुसार महाराजांचे घोडे गावातून जात असताना ग्रामस्थांना पाहण्याचा योग मिळत असे. गावातील शिवकालीन तळी या ठिकाणी पुढील काळात ब्रिटिश काळात घोडे बांधण्यात येत असत, अशी माहिती ग्रामस्थ सांगतात. तसेच सुकाडबाव हे बांधकाम पांडवकालीन असल्याची आख्यायिका असून, पांडवांनी एका रात्रीत हे बांधकाम केल्याची लोकपरंपरा आहे.

५) स्वातंत्र्यलढा व देशसेवा

चोरवणे गावाने देशसेवेसाठी अनेक सुपुत्र दिले आहेत—

1. श्री. माणिक धर्माजी जाधव – सैनिक,                                 2. श्री. भिवा शिवराम चव्हाण – स्वातंत्र्य सैनिक

3. श्री. अनंत केरू कांबळे – सैनिक                                        4. श्री. सदाशिव सयाजी कांबळे – सैनिक

5. श्री. कृष्णा पांडुरंग कांबळे – सैनिक                                     6. श्री. गोपाळ धाकु कांबळे – सैनिक

हे सर्व गावाच्या इतिहासातील अभिमानाचे अध्याय आहेत.

६) धार्मिक स्थळे , श्रद्धास्थान व पर्यटन स्थळे

चोरवणे गाव धार्मिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे.

१)जुगाई देवी मंदिराखाली झरा असून तो वर्षभर वाहतो. या ठिकाणास गावकरी “मठी” म्हणून ओळखतात.

२) विठ्ठलाई देवी – कवळ किंवा गवत तोडण्यापूर्वी देवीचा हुकूम घेतला जातो. नवसाला देवी पावते, अशी ग्रामस्थांची

     श्रद्धा आहे.

३) विश्वेश्वर मंदिर – पांडवकालीन  ४) केशरोबा मंदिर – पांडवकालीन ५) वाघबीळ ५) राम मंदिर, ६)दत्त मंदिर, ७)हनुमान मंदिर ८)गणपती मंदिर – चिरमुले कुटुंबाने स्थापन केलेले

गावदेवळामध्ये १) जुगाईदेवी २) धनीणदेवी ३) नवलाई देवी ४) पावणाई देवी ५) रवळनाथ ६) सोंबा देव

भराडीन देवी,

पर्यटन स्थळे

१) चिरेखाण धबधबा, २) तळ्याचा पऱ्या ३) सातरंगी कडा धबधबा ४) मठी

७) ग्रामपंचायतीची स्थापना व लोकशाही परंपरा

ग्रामपंचायत चोरवणेची स्थापना सन 1956 मध्ये झाली.ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच श्री. वामन भार्गव देवस्थळी होते. तेव्हापासून ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासाची मुख्य केंद्रबिंदू ठरली आहे.

८) सण, उत्सव व सामाजिक एकोपा

चोरवणे गावातील प्रमुख सण व उत्सव—

१)शिमगो उत्सव – पंचक्रोशीतील सर्वात मोठी जत्रा, २)विठ्ठलाई देवी यात्रा – ग्रामस्थांच्या निर्णयानुसार

३) विश्वेश्वर महाशिवरात्र ४) रामनवमी ५) सार्वजनिक गणेशोत्सव ६)हनुमान जयंती

हे सर्व सण सामूहिक सहभागातून व सामाजिक सलोख्याने साजरे केले जातात.

 

९) पारंपरिक शेती, व्यवसाय व लोकसंस्कृती

पारंपरिक व्यवसाय—

     १) शेती  २)बुरुडकाम  ३)पशुसंवर्धन

     पूर्वी घेतली जाणारी पिके— भात, नाचणी, हरिक, बरड, वरी, सावा, तीळ, तूर, उडीद, कुळीत, पावटे, कांग.

 १०)  लोकसंस्कृती

वेट-बिगारी पद्धत, सामूहिक शेती भलरी, सापड, मळणीवरील ओव्या व गाणी

११) शिक्षण व आरोग्य सुविधा

गावातील पहिली शाळा लोकल बोर्ड शाळा होती. लोकल बोर्ड संपुष्टात आल्यानंतर सन 1960 मध्ये जिल्हा परिषद शाळा सुरू झाली.उपचारासाठी सुरुवातीपासूनच खानू सरकारी दवाखाना वापरात आहे.

 

 

१२) पायाभूत सुविधा व विकास

       गावामध्ये 1966 नंतर वीज सुविधा सुरु झाली. त्याआधी मोठ्या चक्रीवादळाचा फटका बसला. 1977 नंतर रस्ते

       सुविधा 1992 पासून घरोघरी पाणीपुरवठा योजना, जी आजही कार्यरत आहे

१३) अविस्मरणीय घटना

       १) प्लेगची साथ २)देवीची सात – सन 1953 ३)विनाशकारी चक्रीवादळ

       या घटनांनी गावाचा इतिहास घडवला व ग्रामस्थांना अधिक सक्षम बनवले.

समारोप

आज चोरवणे गाव हे समृद्ध इतिहास, सामाजिक सलोखा, धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि विकासात्मक वाटचाल यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत चोरवणे गावाची ही वाटचाल निश्चितच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.